(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आजकाल बहुतेक लोक परदेशात जाऊन कोट्यवधी रुपयांची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. कल्पना करा, तुम्हाला अमेरिकेतून वार्षिक ३ कोटी रुपये पगाराची नोकरीची ऑफर मिळाली, पण तुम्ही ती नाकारून तुमच्या मूळ गावी किराणा दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. हे थोडे विचित्र वाटू शकते, तुम्ही हा मुर्खपणा समजा. काही तर डोक्यावर हाथ मारुन घेतील. पण कानपूरच्या एका तरुणाने असा निर्णय घेतला ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नेमकं काय कारणं होतं की त्याने कोट्यवधीच्या नोकरीला लाथाडून किराणा दुकान टाकण्याचा पर्याय निवडला. जाणून घेऊयात संपूर्ण स्टोरी.
IIT मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये सुवर्णपदक विजेता असलेल्या विवेक शर्माला अमेरिकेतून वार्षिक अंदाजे ३ कोटी रुपये पगाराची नोकरीची ऑफर मिळाली. पण परदेशात करिअर करण्याऐवजी, त्याने आपल्या मूळ गावी राहून कुटुंबाचे किराणा दुकान सांभाळण्याचा निर्णय घेतला. आज लोक सोशल मीडियावर त्याच्या निर्णयाचे आणि विचारांचे कौतुक करत आहेत.
व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, विवेक शर्मा यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका स्टार्टअपकडून अंदाजे $240,000 म्हणजेच वार्षिक २९० दशलक्ष रुपये किमतीची नोकरीची ऑफर मिळाली आहे. या ऑफरमध्ये व्हिसा स्पॉन्सरशिप, स्थलांतरण लाभ आणि जागतिक स्तरावर करिअर घडवण्याची संधी यांचा समावेश आहे.
विवेक एका निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील रेल्वेमध्ये क्लर्क आहेत, तर त्याची आई शिकवणी घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. कुटुंबाने आपली बचत त्याच्या शिक्षणावर खर्च केली आणि त्याला IIT मध्ये भरगोस यश मिळवण्यासाठी बरीच धडपड केली.
अमेरिकेला जाण्याची तयारी करत असताना, विवेकच्या नशिबाने अचानक कलाटणी घेतली. विवेकच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्या आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले. परदेशात करिअर करण्याऐवजी, विवेकने आपल्या आई-वडिलांसोबत राहणेच योग्य आहे असे ठरवले. आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, विवेकने कानपूरमध्ये एक किराणा दुकान उघडले. त्याने गरजू मुलांना मोफत कोडिंग शिकवण्यासही सुरुवात केली.
विवेकची कहाणी समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर लोक त्याच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत. अनेक वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की यश केवळ उच्च पगाराने मोजले जात नाही, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घेतलेल्या निर्णयांवरूनही मोजले जाते.






