पोलीस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन
राज्य पोलिस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे. या भरतीसाठी राज्यातील जवळपास 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अशातच आता पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळले आहे. बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
बीडमध्ये 170 जागांसाठी पोलीस भरती होत आहे. यासाठी 8400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, बुधवारपासून मैदानी चाचणी प्रक्रिया सुरु झाली. ही भरती प्रक्रिया सुरु असतानाच आज (ता.21) हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. भरतीसाठी सकाळी आलेल्या एका उमेदवाराने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचा प्रकार घडला. सध्या त्याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
टर्मिन इंजेक्शन असल्याचा संशय
काही उमेदवार भरती प्रक्रिया पार करण्यासाठी अशा द्रव्यांचे सेवन करीत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी काही उत्तेजक द्रव्यांची मदत होत असल्याने उमेदवार त्या वापरताना दिसतात. याबाबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “साधारणपणे व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये, यासाठी मीफेट्रामाईन घटक असलेले ‘टर्मिन’ नावाचे इंजेक्शन घेतले जाते. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडलेले इंजेक्शन तेच असावे, असा अंदाज आहे.”
अहवालानंतरच अधिकृत माहिती मिळणार
दरम्यान, पोलिसांनी हे इंजेक्शन जप्त केले असून, याबाबत एफडीएला बोलाविण्यात आले आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल त्यांच्याद्वारे मुंबई येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे. असेही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटले आहे.