फोटो सौजन्य- सोशल मीडिया
JoSAA Counselling 2026: देशातील प्रमुख राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ‘जॉइंट सीट अलोकेशन अथॉरिटी’ची (JoSAA Counselling 2026) समुपदेशन (काउन्सिलिंग) प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs) आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट (GFTIs) मध्ये प्रवेश मिळेल. ‘जोसा’ने जाहीर केलेल्या अधिकृत सीट मॅट्रिक्सनुसार, यंदा इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
शिक्षणतज्ज्ञ देव शर्मा यांच्या विश्लेषणानुसार, वर्ष २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये राष्ट्रीय संस्थांमधील इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये ४,४७० ची वाढ झाली आहे. वर्ष २०२५ मध्ये एकूण ६२,८५३ जागांवर प्रवेश दिला गेला होता, तर वर्ष २०२६ मध्ये ही संख्या वाढून ६७,३२३ झाली आहे. संस्थांची एकूण संख्याही १२८ वरून १३६ झाली असून, यामध्ये ९ नवीन जीएफटीआय (GFTI) आणि देशातील अव्वल क्रमांकाची संस्था आयआयएससी (IISc) बेंगळुरूचा समावेश झाला आहे.
इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे देशातील २३ आयआयटी (IIT) मधील जागांमध्ये ६६६ ची वाढ झाली आहे. वर्ष २०२५ मध्ये आयआयटीमध्ये १८,१६० जागा आता वाढून १८,८२६ झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, पहिल्यांदाच आयआयएससी (IISc) बेंगळुरूच्या १२५ बीटेक (BTech) जागांचाही जोसा काउन्सिलिंगमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आयआयएससीमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग, मटेरिअल सायन्स, मॅथेमॅटिक्स अँड कम्प्युटिंग आणि मेकॅनिक्स अँड कम्प्युटिंग यांसारख्या कोर्सेसना प्रवेश मिळेल. या दोन्ही संस्थांच्या मिळून एकूण १८,९५१ जागांवर जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) द्वारे प्रवेश दिला जाईल.
NIT: एनआयटीच्या जागांमध्ये ६३७ ची वाढ झाली असून, आता एकूण जागा २५,१६२ झाल्या आहेत.
IIIT: ट्रिपल आयटीमध्ये सर्वाधिक १,५७८ जागांची वाढ झाली असून, आता एकूण जागा ११,५१८ झाल्या आहेत.
GFTI: ४७ जीएफटीआयमध्ये १,४६४ जागांच्या वाढीसह आता एकूण ११,६९२ जागांवर प्रवेश दिला जाईल.






