फोटो सौजन्य- सोशल मीडिया
How To Study After long Career Break Inspiring Story: असे म्हणतात की, शिकण्याला आणि लिहिण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते. जर मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर माणूस आपले ध्येय कधी ना कधी नक्कीच साध्य करतो. याचेच एक अनोखे आणि प्रेरणादायी उदाहरण एका ४५ वर्षीय महिलेने जगासमोर सादर केले आहे. त्यांनी आपल्या मुलासोबत थेट आयआयटीची (IIT) पदवी (डिग्री) मिळवून हे सिद्ध केले आहे की, शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते; तुम्ही जेव्हा हवं तेव्हा एक नवीन सुरुवात करू शकता आणि यश मिळवू शकता.
आम्ही बोलत आहोत जिगीषा टेलर यांच्या यशाबद्दल, ज्यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी पुन्हा शिकण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलासोबत आयआयटी मद्रासमध्ये (IIT Madras) प्रवेश मिळवला. मायलेकांनी एकत्र अभ्यास केला आणि ‘डेटा सायन्स’ प्रोग्राममध्ये पदवी संपादन केली. चला जाणून घेऊया जिगीषा टेलर यांची ही प्रेरणादायी यशोगाथा…
गुजरातच्या भरूच येथील रहिवासी असलेल्या जिगीषा टेलर यांनी जवळपास १६ वर्षे एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना त्यांचे अध्यापनाचे करिअर सोडावे लागले. यानंतर, २०१९ मध्ये त्यांनी स्वतः पुन्हा एकदा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. अध्यापनाच्या क्षेत्रापासून दूर जात त्यांनी स्वतः एक विद्यार्थिनी बनून पुढे जाण्याचे ठरवले आणि आपल्या मुलासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासमध्ये प्रवेश घेतला.
आपल्या २१ वर्षांच्या मुलासोबत जिगीषा यांनीही ‘डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन’ (Data Science and Applications) मधील बीएस (BS) पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. वर्ष २०२१ मध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांच्या मुलाने सर्वप्रथम या ऑनलाईन बीएस डिग्री प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर, २०२२ मध्ये जिगीषा यांनीही त्याच प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवला. नुकत्याच आयआयटी मद्रास येथे पार पडलेल्या दीक्षांत समारंभात (कॉन्व्होकेशन सेरेमनी) मायलेकांनी एकत्र स्टेजवर जाऊन आपली पदवी स्वीकारली. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण भारावून गेले.
दीर्घ खंडानंतर पुन्हा अभ्यास सुरू करणे सोपे नव्हते. सुरुवातीला जिगीषा यांना गणित (मॅथेमॅटिक्स) आणि सांख्यिकी (स्टॅटिस्टिक्स) यांसारख्या विषयांमध्ये अडचणी येत होत्या. परंतु, त्यांनी शिकणे थांबवले नाही. घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्या रात्रीच्या वेळी शंका निरसन सत्रांमध्ये (डाऊट-क्लियरिंग सेशन्स) सहभागी व्हायच्या. या प्रवासात आई आणि मुलगा एकमेकांचे ‘स्टडी पार्टनर’ बनले होते. दोघांनीही एकमेकांना सतत प्रोत्साहित केले आणि उत्तम गुणांसह ही पदवी पूर्ण केली.






