फोटो सौजन्य- सोशल मीडिया
avitra Portal Ashramshala shikshak Bharti: राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया आता ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील इतर मार्गदर्शक सूचना मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे यांनी जारी केल्या आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये विजाभज (विमुक्त जाती व भटक्या जमाती )प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांचा यामध्ये समावेश आहे.
या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि एकसमान निकष लागू होण्यास मदत होणार आहे. उमेदवारांना अर्ज प्रक्रिया, पात्रता पडताळणी, गुणवत्ता यादी आणि निवड प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून पार पाडता येणार आहे.
संदर्भातील शासन पत्रानुसार सर्व प्रादेशिक उपसंचालक, सहायक संचालक आणि संबंधित आश्रमशाळांना लॉगिन आयडी व संकेतशब्द उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र ‘अ’ व ‘ब’ मधील आवश्यक माहिती तातडीने संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आश्रम शाळेवर पवित्रपोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून अभियोग्याताधारक, प्रचंड गुणवत्ता असलेले शिक्षक, ऊसतोड कामगार, वंचित दुर्लक्षित घटकाला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल.
राज्यातील समाजकल्याण विभाग, अल्पसंख्याक शाळा यावर ही शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल मार्फतच व्हावी, तेव्हाच कुठे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी होईल असे वक्तव्य युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले.






