फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET Paper Leak Case : नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाच्या तपासात सातत्य नवनवीन पैलू समोर येत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्याशी संबंधित नेटवर्क अत्यंत पद्धतशीरपणे काम करत असल्याचा आरोप तपास यंत्रणेचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालकांना त्यांच्या मुलांना निवडीबाबत पूर्ण खात्री दिली जात होती. याबदल्यात लाखो रूपयांचे पालकांशी व्यवहार ठरत होते. अनेक पालक त्यांना ‘ब्लँक चेक’ देण्यासही तयार होते, असा दावा तपासशी सुत्रांनी केला आहे. तसेच सुरवातीला टोकन रक्कम घेतली जात असून परीक्षा संपल्यावर प्रश्नांचे क्रॉस चेक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जात असे.
नीट पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर लातूरच्या पूर्वीच्या परीक्षा निकालांबाबतही चर्चांना उधाण आले आहे. सीबीआय खुलास्याद्वारे समोर आलेल्या तपासात नीटची प्रश्नपत्रिका पुण्याहून राजस्थानपर्यंत पोहचवण्यात आली होती. पुणे येथील आरोपींनी टेलीग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका (पीडीएफ फाईल) गुरुग्राम मार्ग धरून राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहवल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. या माहितीनुसार,१५० प्रश्नांच्या बदल्यात सुमारे १० लाख रुपयांची डील झाली आहे. या नेटवर्कमध्ये अनेक राज्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या अटक सत्रानंतर, आता ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनी या लीक पेपरचा फायदा घेतला त्यांचीही चौकशीही सुरू झाली आहे. आरोपाच्या चौकशीत ज्या लोकांची नावे येत आहेत. त्यांना सीबीआय बोलवून त्यांची चौकशी करत आहे. तसेच प्रश्नपत्रिका कोणत्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आणि किती पैसे घेतले गेले याचाही शोध घेतला जात आहे.
सीबीआय आणि ईडीने आरोपीच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसापासून आरोपीच्या नावावर कुठे आणि किती संपत्ती आहे. याचा शोध घेतला जात आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या बेकायदेशीर संपत्तीवर कारवाई होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.






