फोटो सौजन्य- सोशल मीडिया
RCC Latur NEET Paper Leak : नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रातील अनेक कोचिंग इंस्टीट्यूटमध्ये अढळत आहेत. नांदेड कारवाईनंतर, आता सीबीआयचा मोर्चा लातूरकडे वळाला आहे. केंद्रीय अन्वेशण विभागाने (CBI) लातूर येथील प्रसिद्ध कोचिंग संस्थेचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी मोटेगावकर यांचा एक व्हिडेओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यामध्ये ते आपल्या विद्यार्थ्यांना विचारत होते की, त्यांनी घेतलेल्या मॉक टेस्टमधील (सराव परीक्षेत) किती प्रश्न मुख्य परीक्षेत आले आहेत. तपासात समोर आले आहे की, आरसीसीच्या सराव परीक्षेत विचारण्यात आलेले केमिस्ट्रीचे 42 प्रश्न मुख्य नीट परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. या संशयामुळे ते सीबीआयच्या रडारवर आले आहेत.
लातूरमधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक सायन्स शिक्षक म्हणून केली होती. सुरुवातीला 1999 मध्ये त्यांनी 10 विद्यार्थ्यासह एका भाड्याच्या खोलीत कोचिंग क्लास सुरू केले. तिथे ते केमिस्ट्री शिकवू लागले. त्यावेळी त्यांच्याकडे 10 वी, 12 वी आणि प्रवेश परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्याकडे येत होते. केमेस्ट्रीमध्ये गोल्ड मेडलिस्ट असणारे शिवराज मोटेगावकर पुढे केमिस्ट्री विषय अत्यंत सोप्या भाषेत शिकवणारे शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या RCC (रेणुकाई करिअर सेंटर) या संस्थेला लातूरच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधार मानले जात होते. सध्या या संस्थेचा वार्षिक टर्नओवर तब्बल 100 कोटी रूपये आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळामध्ये आरसीसी (RCC) ही संस्था वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ब्रँड मानली जाते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात या संस्थेच्या अनेक शाखा विस्तारल्या असून सध्या 40 हजारहून अनेक विद्यार्थी येथे जेईई, नीट, सीईटी परीक्षांची तयारी करत आहेत.
माटेगावकर यांच्या अटकेनंतर ‘RCC’च्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिसून येते की, हि संस्था नीट-री एक्झामची तयारी करून घेत आहे.






