NEET Paperleak Case: नीट पेपरफुटीत सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; लातूरच्या नामांकित बालरोगतज्ज्ञाला अटक
सीबीआयच्या माहितीनुसार, डॉ. मनोज शिरुरे यांनी शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) याच्याकडून पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय आहे. सीबीआयने त्यांना लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
डॉ. शिरुरे हे लातूर शहरातील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या सीबीआयच्या पथकाने त्यांच्या रुग्णालयात छापा टाकत साडेचार तास कसून चौकशी केली. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे यांचे पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून हे नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा घोटाळा केवळ एका वर्षापुरता मर्यादित नसून, संघटित रॅकेटच्या माध्यमातून अनेक वर्षे सुरू असल्याची शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, सीबीआयच्या तपासातून NEET पेपरफुटीची संपूर्ण ‘मोडस ऑपरेंडी’ समोर आली आहे. तपासानुसार, शिवराज मोटेगावकरने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचला होता. त्याने आपल्या कोचिंग क्लासमधील सहकाऱ्यांना नॅशनल टेस्टींग एजन्सी ( National Testing Agency) च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर नियुक्त करून घेतले. त्यामध्ये Manisha Mandhare आणि पी. व्ही. कुलकर्णी यांचा समावेश होता.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कुलकर्णी यांनी केमिस्ट्री तर मनीषा मांढरे यांनी बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लक्षात ठेवले. प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी प्रश्न तोंडपाठ करून नंतर हाताने लिहून काढले आणि ते मोटेगावकरकडे पाठवले. मोटेगावकरने हे प्रश्न PDF स्वरूपात मोबाईलमध्ये सेव्ह करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना लाखो रुपयांच्या बदल्यात विकल्याचा आरोप आहे.
Pharmacy Colleges Ban : मुख्यमंत्र्यांनी फार्मसी कॉलेजेसवर का घातली बंदी? जाणून घेण्यासाठी एकदा
३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरने मोबाईलमधील डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले. मात्र, सीबीआयने डिजिटल डेटा रिकव्हर करून महत्त्वाचे पुरावे मिळवले आणि त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणात आतापर्यंत प्रश्नपत्रिका फोडणारे आणि विकणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली होती. मात्र, आता स्वतःच्या मुलासाठी पेपर विकत घेणाऱ्या पालकावरही कारवाई झाल्याने NEET पेपरफुटी प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. देशभरातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेवर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आणखी काही मोठ्या नावांचा तपासात उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






