फोटो सौजन्य- सोशल मीडिया
अमरावतीमधील शासकीय तंत्र निकेतनमधील उत्कृष्टता केंद्र आणि अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी प्रविण पोटे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर आदी उपस्थित होते.
सुरवातीपासूनच रोजगारक्षम युवक तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार
पालकमंत्री श्री. पाटील यांनी, देशात नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कौशल्यपूर्ण युवक तयार करण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी भर देण्यात येत आहे. जुन्या शैक्षणिक धोरणात उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य देण्यात येत नसल्यामुळे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत होते. आता सुरवातीपासूनच रोजगारक्षम युवक तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे.
संशोधन केंद्रासाठी केंद्राने 272 कोटी रूपयांचा निधी
तसेच युवकांना संगणकातील अत्याधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि थ्री डी प्रिंटींग उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तंत्रनिकेतनमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी संस्थांमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संशोधन केंद्रासाठी केंद्राने 272 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
अमरावती येथील तंत्रनिकेतनला अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला आहे. तातडीने अतिक्रमण काढून संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
अमरावती शासकीय तंत्रनिकेतन
शासकीय तंत्रनिकेत, अमरावती ही शासनाची स्वायत्त संस्था आहे. पॉलिटेक्निक, महाराष्ट्र 1955 मध्ये स्थापन झाले. या संस्थेचा तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्याचा आणि समाजाला तांत्रिक सेवा प्रदान करण्याचा मोठा वाटा आहे. या संस्थेमधील अनेक विद्यार्थी विविध शासकीय संस्थांमध्ये सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. काही विद्यार्थी हे यशस्वी उद्योजकही झाले आहेत. तंत्रनिकेतन संस्थेची एकूण कामगिरी पाहता एमएसबीटीई ( Maharashtra State Board of Technical Education) मुंबई द्वारे 1995 पासून संस्थेला शैक्षणिक स्वायत्तता प्रदान केली गेली.
महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या ISTE ने संस्थेला 2005 मध्ये नरसी मोंजी पुरस्कार आणि 2015 मध्ये सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक पुरस्काराने सन्मानित केले आहे. संस्थेकडे निवासासाठी सर्व सुविधांसह स्वतंत्र प्रशिक्षणार्थी वसतिगृह आहे. संस्थेकडे सर्व सुसज्ज संसाधनांसह स्वतंत्र ग्रंथालय इमारत आहे. आता अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन झाल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.