फोटो सौजन्य - Social Media
विज्ञानाचे खरे आणि प्रत्यक्ष ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विज्ञान भारतीच्या वतीने वाशिम येथे ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. जुने भारतीय विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विज्ञान भारती सातत्याने कार्यरत असल्याचे प्रतिपादन विज्ञान भारती नागपूरचे नरेंद्र सातफळे यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत सातफळे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. विज्ञान भारतीची स्थापना नागपूर येथे १९९१ मध्ये झाली असून, गेल्या ३८ वर्षांपासून संस्था विज्ञानप्रसारासाठी कार्यरत आहे. समाजातून मिळणारा पाठिंबा पुन्हा समाजालाच परत देण्याचे काम विज्ञान भारती करत असून, कोणतेही शासकीय अनुदान न घेता सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सतीन मेश्राम यांनी सांगितले की, ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनीत मॉडर्न मेडिसिनसोबतच आयुर्वेद, होमिओपॅथी यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असून, विज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
या प्रदर्शनीमध्ये डेंटल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज तसेच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले स्टॉल उभारावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी रिसोड येथील मन्नामलाल अग्रवाल आणि त्यांच्या टीमने मोठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
प्रदर्शनीत मानवी शरीरातील मेंदू, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे प्रत्यक्ष मॉडेल्स, तसेच डायलिसिस, सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांसारख्या वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक यंत्रांचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. शरीरातील प्रत्येक अवयव कसा कार्य करतो, विविध आजारांचे निदान कशा पद्धतीने केले जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रत्यक्ष पाहता व समजून घेता येणार आहे.
यापूर्वी नागपूर आणि भंडारा येथे यशस्वीरीत्या पार पडलेली ही प्रदर्शनी आता वाशिम या आकांक्षीत जिल्ह्यात आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. हरीश बाहेती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सतीन मेश्राम आणि त्यांच्या टीमच्या पुढाकाराने हा उपक्रम साकार होत आहे. पत्रपरिषदेला नरेंद्र सातफळे, डॉ. सतीन मेश्राम, दीपक जहागीरदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ही प्रदर्शनी महत्त्वाची ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.






