फोटो सौजन्य: गुगल
पनवेल : राज्यात सध्या 12 विच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच कामोठे वसाहतीत 12 विच्या उत्तरपत्रिकेंचा अख्खा संचच रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडासी आहे. 28 मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्या नंतर या बाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे.
सापडलेल्या उत्तरपत्रिका पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत . ऐन परीक्षा काळात घडलेल्या या प्रकारामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात येणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या प्रमुख आदिती सोनार यांनी दिली आहे.दरम्यान या बाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कामोठे येथे राहणाऱ्या एका शिक्षकां कडून हे पेपर गहाळ झाले असल्याची माहिती संबंधित शिक्षकाने मुंबई विदयापीठाला दिली आहे. असं मुंबई विदयापीठाकडून सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जालन्यात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पनवेलमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांच्य़ा उत्तर पत्रिकांचा खच रस्यावर पडलेला दिसल्याने शिक्षण मंडळावर ताशेरे ओढले जात आहेत. राजरोसपणे असं कृत्य करण्याची हिंमत केली जात असून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाच्या नियमांना धाब्य़ावर बसवलेले दिसून येत आहे. या सगळ्य़ा प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणाच्य़ा सुरुवातीच्या काळात कॉपीमुक्त परीक्षा हा उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र जालनामध्ये झालेल्या पेपरफुटीमुळे शिक्षण संस्थेबाबत अनेक सवाल उपस्थित राहिले आहेत. पनवेलमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिकांबाबत झालेल्या या प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरु असून अद्याप याबाबत शिक्षण मंडळाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया आलेली नाही.