फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील आरोग्य सेवेला अधिक बळकट करण्यासाठी एप्रिल महिन्यात १,५०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंबंधी जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. नुकतीच ४५० डॉक्टरांची भरती करण्यात आली असून, ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील महामार्ग, अपघातप्रवण क्षेत्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्ग येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी व्यापक आराखडा तयार केला जाणार आहे. यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार १०८ रुग्णवाहिकांचे नव्याने कंत्राट देणार आहे. याअंतर्गत १,८०० नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील १३ कोटी नागरिकांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी जबाबदार आहे. या विभागामार्फत प्राथमिक आणि दुय्यम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. यामध्ये जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महिला रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये यांचा समावेश होतो. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांद्वारे समुदाय पातळीवर आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.
राज्यात विविध आरोग्य योजना आणि संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये काही योजना-विशिष्ट क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होतो. यामध्ये आरोग्य सेवा आयुक्तालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य हमी सोसायटी आणि कर्मचारी राज्य हमी सोसायटी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तूखरेदी प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी आणि राज्य रक्त संक्रमण परिषद यांचा समावेश आहे.
राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांमधील स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र धोरण आखले जाणार असून, लवकरच त्यासंदर्भात आवश्यक पावले उचलली जातील. डॉक्टर भरती, ट्रॉमा केअर सेंटर, रुग्णवाहिका सेवा आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुधारणा यांसारख्या योजनांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.