( फोटो सौजन्य : IANS )
दूतावासाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच, संभाव्य धोका टाळण्यासाठी खिडक्या आणि उघड्या जागांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
सध्या कतारमधील हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्यात आले असून सर्व विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित आहेत. या संदर्भात कतर एअरवेज 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नवीन माहिती जाहीर करणार आहे, तोपर्यंत प्रवाशांनी आपल्या एअरलाईन्सच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. व्हिसाबाबत दिलासा देताना कतारच्या अंतर्गत मंत्रालयाने जाहीर केले आहे की, ज्यांचे प्रवेश व्हिसा संपले आहेत किंवा संपणार आहेत, अशा सर्व श्रेणीतील व्हिसाची मुदत एका महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. ही सवलत 28 फेब्रुवारी 2026 पासून प्रभावी मानली जाईल आणि गरजेनुसार यात आणखी वाढ केली जाऊ शकते.
ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत कतारमधून बाहेर पडायचे आहे, त्यांच्यासाठी सौदी अरबकडे जाणारी ‘सलवा’ भू-सीमा सध्या खुली ठेवण्यात आली आहे. ज्या भारतीय नागरिकांकडे अमेरिका, ब्रिटन किंवा शेंगेन देशांचा वैध व्हिसा आहे, त्यांना सौदी अरबमध्ये पोहोचल्यावर लगेच व्हिसा मिळू शकतो. इतर नागरिकांना ठराविक प्रक्रियेनुसार सौदी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. जे भारतीय नागरिक सध्या कतारमध्ये विमान प्रवासाच्या ट्रान्झिटमध्ये अडकले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी भारतीय दूतावास सौदी अरबचा तात्पुरता ट्रान्झिट व्हिसा मिळवून देण्यासाठी विशेष नोंदणी लिंक सुरू करत आहे.
ही ट्रान्झिट व्हिसाची सुविधा मिळवण्यासाठी प्रवाशांकडे सौदी अरबमधून बाहेर जाण्याचे निश्चित विमान तिकीट असणे आवश्यक आहे. नोंदणी करताना कतारला येण्याचे आणि सौदीतून बाहेर जाण्याचे तिकीट जमा करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी दूतावासाला किमान 48 तासांचा वेळ लागणार असून, सीमेपर्यंत जाण्याची आणि पुढील प्रवासाची व्यवस्था नागरिकांना स्वतःच करावी लागेल. अधिक माहिती किंवा आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाने +97455647502 किंवा +97455362508 हे हेल्पलाईन नंबर देखील जारी केले आहेत.






