सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर नगरसेवक स्वप्निल दुधाने दररोज नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कर्वेनगर उड्डाणपुलाखाली असलेल्या मुख्य चौकामध्ये वाहतुकीच्या समस्या, हिंगणे होम कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील समस्या तसेच कर्वेनगर मुख्य उड्डाणपुलाखालील चौकात २०११ साली मनपाच्या वतीने बांधण्यात आलेल्या दोन भुयारी मार्ग याबाबत सुधारणा करण्यासंबंधी नगरसेवक दुधाने यांनी अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून समस्या दाखविल्या आणि समस्या दूर करा, असे सांगितले.
पुणे मनपाचे प्रकल्प विभागाचे उपअभियंता, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता, संबंधित पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, संबंधित विद्युत विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दुधाने यांनी पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी नगरसेवक दुधाने म्हणाले, मनपाच्या वतीने नागरिकांच्या सूचना ध्यानात घेता धोरणात्मक निर्णय घेणे काळाची गरज बनले आहे. बंद अवस्थेतील रस्ते बंद असण्याची कारणे, वाहतूक समस्या, विद्युत समस्या तसेच अन्य समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली. येत्या काही महिन्यात तात्पुरती मलमपट्टी न करता मनपाच्या वतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी केली. याप्रसंगी अधिकारी वर्गानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सदर चौक समस्यामुक्त होईल, असा विश्वास वाटतो, असं स्वप्निल दुधाने म्हणाले.
हे सुद्धा वाचा : पुणे होणार ट्रॅफिकमुक्त! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा
दुधाने यांनी केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत
१) कर्वेनगर मुख्य चौकातील बस स्टॉप हा 70 मीटर ने पुढे घेऊन दोन बस स्टॉपच्या ऐवजी एकच मोठा बस स्टॉप उभारण्यात यावा.
२) कर्वेनगर मुख्य चौकामध्ये मुख्य चौकाला तीन रस्ते येऊन मिळत असल्याने मुख्य चौकामध्ये थर्मो प्लास्टिकचे पांढरे पट्टे झेब्रा कॉसिंग दिशादर्शक फलक नो पार्किंग से बोर्ड व इतर इमर्जन्सी वात्यावश्यक अत्यावश्यक वाहतुकी संदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे.
३) कर्वेनगर मुख्य चौकामध्ये २०११ साली बांधण्यात आलेले दोन्हीही भुयारी मार्ग हे आज तागायत बंद अवस्थेत आहेत, ते पूर्णपणे चालू करण्याकरिता कायमस्वरूपी या दोन्हीही भुयारी मार्गांकरता पावसाळी लाईन विकसित करणे आवश्यक आहे. कारण या दोन्ही भुयारी मार्गात जवळपास तीन ते चार फूट पाणी कायम साचलेले असते. त्यामुळे नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. तसेच दोन्ही भुयारी मार्गाची पुन्हा नव्याने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
४) हिंगणे होम कॉलनीच्या मुख्य प्रवेश असणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची समस्या असल्याने येथील नियोजन करून होम कॉलनीचे प्रवेशद्वार वाहतुकीच्या अनुषंगाने व्यवस्थित करावे.
५) कर्वेनगर मुख्य चौकामध्ये बेकायदेशीर पद्धतीने मोठ-मोठे टेम्पो, गाड्या या रस्त्याच्या मधोमध पार्किंग करत असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. वाहतूक विभागाशी बोलून मुख्य चौकामध्ये नो पार्किंग करून त्यावर कडक कारवाई व्हावी.
६) उड्डाणपुलाखाली प्रकाश व्यवस्था जास्त असावी, जेणेकरून रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन गैरप्रकार होणार नाही.






