फोटो सौजन्य - Social Media
भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अर्ज प्रक्रिया १५ जून २०२५ पासून सुरू होणार आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवली जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी नवीन तसेच नुतनीकरण अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरू झाले असून, या अर्जांची अंतिम मुदत ३१ मे २०२५ आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयांतील (११वी, १२वी, एमसीव्हीसी, आयटीआय आदी) विद्यार्थ्यांनी १५ जून ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान आपले नवीन व नुतनीकरण अर्ज महाविद्यालयामार्फत महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत. याशिवाय, वरिष्ठ महाविद्यालयांतील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांत (कला, वाणिज्य, विज्ञान शाखा) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज १५ जून ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पाठवावे लागणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात (अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, नर्सिंग) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ जून ते १५ नोव्हेंबर २०२५ ही वेळ देण्यात आली आहे.
सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची प्रथम तपासणी करून त्यांना ऑनलाईन मंजुरी द्यावी व तत्काळ ते अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांच्या लॉगिनवर अग्रेषित करावेत. योजनेचा लाभ कोणताही पात्र विद्यार्थी गमावू नये, यासाठी प्राचार्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिता मते यांनी केले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना शिक्षण क्षेत्रात मोठा आधार ठरणारी आहे आणि आर्थिक अडचणींवर मात करून उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तम संधी प्रदान करणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा.