फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील शालेय क्रीडा चळवळीला नवी दिशा आणि उंची देणारी ‘शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा २०२५-२६’ पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर आणि जिल्हा क्रीडा परिषद, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा २६ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळे येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर, कोल्हापूर आणि पुणे या सात विभागांतील १९ वर्षाखालील मुले व मुली गटातील शालेय खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यभरातील होतकरू, उदयोन्मुख आणि प्रतिभावान खेळाडूंना आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करण्याची तसेच उच्च पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याची ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नुकतीच एक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजीत नितनवार, तांत्रिक समिती अध्यक्ष अशोक सरोदे, निवड समिती सदस्य विनीत सकपाळ, ऋषिकेश राऊळ आणि सायमा राज्य बागवान, स्पर्धा समन्वयक प्रीतीश पाटील, प्राचार्या मधुमती कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुचिता पाटील, क्रीडा शिक्षक रमाकांत घरत व क्रीडा शिक्षिका प्रियंका पाटील यांच्यासह नियोजन समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते. बैठकीत स्पर्धेचे वेळापत्रक, मैदान व्यवस्था, खेळाडूंची सोय, पंच व्यवस्था आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम करांडे, उपाध्यक्ष विलास पाटील, माजी उपमुख्याध्यापक राजन घरत, शारीरिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि जिल्हा समन्वयक आशिष पाटील यांनी उपस्थित राहून आयोजन समितीला मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांनी शालेय स्तरावर खेळाडूंमध्ये शिस्त, संघभावना आणि क्रीडावृत्ती रुजविण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले.
ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त आणि क्रीडासंस्कृती घडविणारी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्यातील क्रीडा चळवळीला नवी दिशा मिळेल, तसेच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यास ही स्पर्धा उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी व्यक्त केला आहे.






