फोटो सौजन्य - Social Media
नोकरी बदलणे हा कोणाच्याही आयुष्यातील मोठा आणि संवेदनशील निर्णय असतो. चांगला पगार, करिअर ग्रोथ, स्थिर भविष्य या अपेक्षांवर अनेकजण हा निर्णय घेतात. मात्र या प्रक्रियेत अनेकदा कर्मचारी आपल्या बॉसवर किंवा कंपनीच्या तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवतो. हाच विश्वास कधी कधी महागात पडतो, याचे जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही कथा ‘आउटकम स्कूल’चे संस्थापक अमित शेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा एक विद्यार्थी आपल्या मूळ गावाजवळील एका कंपनीत वार्षिक १५ लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करत होता. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या उद्देशाने त्याने दुसऱ्या कंपन्यांमध्ये अर्ज केले. त्याच दरम्यान त्याला एका नामांकित कंपनीकडून थेट २६ लाख रुपये वार्षिक पगाराची ऑफर मिळाली. ही संधी त्याच्या आयुष्यातील मोठी झेप ठरू शकली असती. जेव्हा त्याने आपल्या सध्याच्या कंपनीत राजीनामा देण्याचा विचार बॉससमोर मांडला, तेव्हा मॅनेजरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. “तू नोकरी सोडू नकोस, पुढील महिन्यापासून तुझा पगार २६ लाखांपर्यंत वाढवू,” असे आश्वासन मॅनेजरने दिले. हे आश्वासन पूर्णपणे तोंडी होते; कुठलाही ई-मेल, पत्र किंवा लेखी करार नव्हता.
अमित शेखर यांनी आपल्या विद्यार्थ्याला स्पष्ट सल्ला दिला होता की, तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवू नकोस आणि नवीन ऑफर स्वीकार. मात्र त्या कर्मचाऱ्याने बॉसवरचा विश्वास आणि मूळ गावाजवळ राहण्याची सोय या दोन गोष्टींचा विचार करून २६ लाखांची ऑफर नाकारली. त्याला वाटले की सध्याची कंपनीच आपल्यासाठी सुरक्षित आहे. खरी अडचण तेव्हा सुरू झाली, जेव्हा नवीन कंपनीत जॉइन करण्याची अंतिम तारीख निघून गेली. त्यानंतर सध्याच्या कंपनीत पुन्हा एक बैठक झाली. या बैठकीत मॅनेजरने स्पष्ट शब्दांत सांगितले की, पगारवाढीचा कोणताही निर्णय झालेला नाही आणि कर्मचारी १५ लाखांच्या पॅकेजवरच काम करत राहील. त्या क्षणी कर्मचाऱ्याचा विश्वास पूर्णपणे तुटला. २६ लाखांची सुवर्णसंधीही गेली आणि सध्याच्या कंपनीतही परिस्थिती तशीच राहिली.
या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घेताना फक्त तोंडी आश्वासनांवर विसंबून राहणे धोकादायक ठरू शकते. जोपर्यंत पगारवाढ, प्रमोशन किंवा इतर लाभ लेखी स्वरूपात मिळत नाहीत, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी याला कॉर्पोरेट जगातील कडवी पण खरी वस्तुस्थिती म्हटले आहे. एका युजरने लिहिले, “हा अनुभव वेदनादायक आहे, पण प्रत्येक तरुणाने यातून शिकायला हवे.” तर दुसऱ्या युजरने सल्ला दिला की, अशा वेळी मॅनेजरकडून ई-मेल कन्फर्मेशन घ्यावे आणि एचआरला सीसीमध्ये ठेवावे. एकूणच, विश्वास महत्त्वाचा असला तरी करिअरच्या बाबतीत लेखी पुरावे हाच सर्वात मोठा आधार ठरतो, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे






