विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन
तरुणांना रोजगाराभिमुख आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभाग विविध उपक्रम राबवत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे. याच अनुषंगाने जगभरातील नवे नवे तंत्रज्ञान आयटीआयच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचेही मंत्री लोढा म्हणाले. जबील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला तसेच कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख गुंडूराव पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेत निवडक आयटीआय संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी Industry Ready संकल्पनेनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच समकक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जबील कंपनीला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच राज्यभरात व्यापक प्रमाणावर रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी अन्य कंपन्यांचा ही सहभाग वाढवण्यासाठी विभाग प्रयत्न करेल असेही मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण मिळणार असून त्याचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे. या बैठकीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी आयटीआय मध्ये सध्या सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहितीही जबील कंपनीच्या शिष्टमंडळाला दिली.
दरम्यान, जेबिल (Jabil) ही एक मोठी जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन (Electronics Manufacturing Services – EMS) कंपनी आहे, जी विविध उद्योगांसाठी, जसे की ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, आरोग्यसेवा, आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्ससाठी, सर्किट बोर्ड्स (PCBs), ऑप्टिकल उत्पादने आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक डिझाइन, इंजिनिअरिंग आणि बनवते; भारत, विशेषतः गुजरात आणि तामिळनाडूमध्ये, त्यांचे मोठे गुंतवणूक प्रकल्प सुरू आहेत, ज्यामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढण्यास मदत होत आहे.






