फोटो सौजन्य - Social Media
मेहनती माणूस कधीही हरत नाही, हे सिद्ध करून दाखवले आहे महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यातील उमेश गणपत खंडबहाले यांनी. एकेकाळी बारावीच्या इंग्रजीच्या परीक्षेत नापास झालेला हा तरुण आज भारतीय पोलिस सेवेत (IPS) अधिकारी असून सध्या पश्चिम बंगालमध्ये पोलिस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत आहे.
उमेश यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या प्रेरणादायी चित्रपटासारखी आहे. शाळेत ते फारसे हुशार नव्हते. बारावीच्या इंग्रजी विषयात त्यांना फक्त 21 गुण मिळाले आणि ते नापास झाले. घरची आर्थिक परिस्थितीही खालावलेली होती, म्हणून त्यांनी शिक्षण थांबवून वडिलांसोबत काम सुरू केले. दररोज ते गावातून नाशिकला जाऊन दूध विकत आणि घरखर्चाला हातभार लावत. तसेच कधी शेतात काम, कधी मजुरी असे अनेक छोटेमोठे काम करून त्यांनी संसार चालवला.
अडचणींनी उमेश यांना खचवले नाही, उलट त्यांना अधिक मजबूत केले. त्यांनी ठरवले की पुन्हा एकदा प्रयत्न करायचाच. त्यांनी ओपन स्कूलमधून बारावीची परीक्षा पुन्हा दिली आणि यावेळी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर त्यांनी सायन्स शाखेत पदवी शिक्षण घेतले आणि अभ्यासात शिस्त व मेहनतीचा ध्यास घेतला. आयपीएस बनण्याचा त्यांचा प्रवास मात्र अत्यंत कठीण होता. त्यांच्या जवळ कोचिंग क्लास नव्हते, ना मोठे साधनसंपत्ती. पण त्यांच्याकडे होती जिद्द आणि आत्मविश्वास. रोज तासन्तास अभ्यास करून त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली. अनेक अपयशानंतर शेवटी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 704वी रँक मिळवली.
ज्याला कधीकाळी लोक “बारावी फेल” म्हणून हिणवत होते, तोच उमेश आज देशाची सेवा करणारा एक आदर्श अधिकारी ठरला आहे. त्यांची कहाणी आज हजारो युवकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.






