फोटो सौजन्य - Social Media
सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयटीआय लिमिटेड (ITI Limited) ने यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर केली असून, या भरतीद्वारे एकूण २१५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. कंपनीकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. पात्र उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
आयटीआय लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार यंग प्रोफेशनल या श्रेणीत विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये यंग प्रोफेशनल (ग्रॅज्युएट), यंग प्रोफेशनल (टेक्नीशियन), यंग प्रोफेशनल (ऑपरेटर) या पदांचा समावेश आहे. भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक उमेदवार www.itiltd.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक मासिक वेतन दिले जाणार आहे. यंग प्रोफेशनल (ग्रॅज्युएट) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये वेतन मिळणार आहे. यंग प्रोफेशनल (टेक्नीशियन) पदासाठी ३५ हजार रुपये प्रतिमाह वेतन देण्यात येईल. तर यंग प्रोफेशनल (ऑपरेटर) पदावर नियुक्त उमेदवारांना ३० हजार रुपये प्रतिमाह वेतन दिले जाणार आहे. हे वेतनमान पाहता ही भरती तरुणांसाठी चांगली करिअर संधी मानली जात आहे.
उमेदवारांची निवड प्रक्रिया एकूण दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अर्जांचे मूल्यमापन करण्यात येईल. पात्रता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारे उमेदवारांना वेटेज सिस्टमद्वारे शॉर्टलिस्ट केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना एसेसमेंट टेस्टसाठी बोलावले जाईल. या चाचणीनंतर अंतिम मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. मेरिट लिस्टमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना करार तत्त्वावर (Contract Basis) नियुक्ती दिली जाणार आहे.






