फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Corporate Trend 2026: कॉर्पोरेट जगतात अशी काही कामे असतात, जी कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून बळजबरीने करून घेऊ शकत नाही. हाच तो ‘एक्स्ट्रा पुश’ असतो जो एका सामान्य कर्मचाऱ्याला लीडर बनवतो. मात्र, भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातून आता हा ‘एक्स्ट्रा पुश’ गायब होताना दिसत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, कर्मचारी आता ऑफिसला येत आहेत, त्यांचे ठरवून दिलेले काम पूर्ण करत आहेत आणि वेळेवर लॉग-ऑफ करत आहेत—ना कमी, ना जास्त! हेच आता एक नवीन वर्क कल्चर बनत चालले आहे. पूर्वी जिथे अनेक कर्मचारी न सांगता अतिरिक्त जबाबदाऱ्या उचलत असत, तिथे आता अशा उपक्रमांमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे.
प्रत्येक नोकरीमध्ये अशी काही कामे असतात जी कोणताही नियम किंवा आदेश सक्तीने करून घेऊ शकत नाही; जसे की स्वतःहून पुढे होऊन एखादी समस्या सोडवणे, गरज पडल्यास टीमला मदत करणे किंवा वेळ संपल्यानंतरही महत्त्वाचे काम पूर्ण करणे. कर्मचाऱ्यांच्या याच अतिरिक्त मेहनतीला ‘डिस्क्रीशनरी एफर्ट’ म्हणतात. या अतिरिक्त मेहनतीमध्ये किंवा प्रयत्नांमध्ये जी सातत्याने घट होत आहे, त्यालाच ‘एफर्ट रिसेशन’ म्हटले जात आहे.
‘ग्रेट प्लेस टू वर्क इंडिया’ च्या वर्ष २०२६ च्या एका ताज्या अभ्यासानुसार, देशातील १० पैकी ६ कंपन्यांनी गेल्या एका वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांच्या या डिस्क्रीशनरी एफर्टमध्ये सरासरी ५% घट अनुभवली आहे, ज्यामुळे व्यवस्थापन चिंतेत आहे.
रिटेल सेक्टर: हा ट्रेंड रिटेल क्षेत्रात सर्वाधिक पाहायला मिळाला. येथील ८८% कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त प्रयत्नांमध्ये घट नोंदवली आहे.
आयटी आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस: या दोन्ही क्षेत्रांत ७७% कंपन्यांना हाच अनुभव आला.
कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट: येथे ही घट ७१% इतकी नोंदवली गेली.
मजबूत क्षेत्र : वित्तीय सेवांमध्ये (Financial Services) परिस्थिती तुलनेने बरी आहे; तर मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन) सेक्टर यात सर्वात मजबूत ठरला आहे. या क्षेत्रातील केवळ ४४% कंपन्यांनी घट झाल्याचे म्हटले असून, ही सरासरी घट देखील फक्त ३% आहे.
या अहवालाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष ‘नेतृत्वाशी’ (Leadership) जोडलेला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना असे वाटते की त्यांचे मॅनेजर्स त्यांची काळजी घेतात आणि त्यांना चांगला पगार मिळेल, तिथे त्यांचा अतिरिक्त प्रयत्नांचा स्तर ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, जिथे असा विश्वास नसतो, तिथे हा स्तर केवळ २९ टक्क्यांवर येऊन थांबतो. जेव्हा कर्मचारी आपल्या लीडरपासून प्रेरित होतात, तेव्हा त्यांचे अतिरिक्त योगदान ९८% असते; तर प्रेरणेच्या अभावामुळे ते थेट ३२% वर घसरते.
भारतीय कार्यबलामध्ये आता Gen Z (नव्या पिढीचे) कर्मचारी वेगाने वाढत आहेत. अहवालानुसार, एकूण वर्कफोर्समध्ये त्यांचा वाटा आता सुमारे २६ टक्के आहे. त्याच वेळी, कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे होणाऱ्या बदलांचाही सामना करावा लागत आहे. सुमारे ५८% CHROs (मुख्य मानवी संसाधन अधिकारी) चे म्हणणे आहे की, त्यांना एआय (AI) आणि नव्या पिढीच्या अपेक्षा या दोन्हीनुसार एकाच वेळी कामाच्या ठिकाणी बदल करावे लागत आहेत. तसेच, सुमारे निम्मे एचआर (HR) प्रमुख मान्य करतात की, ते अजूनही Gen Z कर्मचाऱ्यांच्या प्राधान्यक्रमांना पूर्णपणे समजू शकलेले नाहीत.






