फोटो सौजन्य - Social Media
जसप्रीत बुमराह भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. जगभरात त्याचे नाव आहे आणि क्रिकेटक्षेत्रात एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात त्याला “बूम-बूम बुमराह” या टोपणनावाने ओळखले जाते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण त्याच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल अनेकांना माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊया जसप्रीत बुमराह याचे शिक्षण आणि त्यांच्याविषयी काही खास गोष्टी.
जसप्रीत बुमराहचा जन्म 29 नोव्हेंबर 1991 रोजी एका शीख पंजाबी कुटुंबात झाला होता, जे मूळचे दिल्लीचे असून अहमदाबाद, गुजरातमध्ये राहत होते. बुमराह जेव्हा फक्त 5 वर्षाचा होता, तेव्हा त्याचे वडील जसबीर सिंग यांचे निधन झाले. त्याच्या आई, दलजित बुमराह या अहमदाबादमधील एक मध्यमवर्गीय शिक्षिका होत्या आणि त्या निर्माण हायस्कूल, वस्त्रापूर येथे उपमुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. जसप्रीतचे शालेय शिक्षण याच शाळेत झाले. त्याच्या शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाले तर त्यांनी 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
बुमराह शाळेच्या क्रिकेट संघाचा भाग होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी गुजरातची रॉयल क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला, जिथून त्याच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली.
बुमराहने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण ऑक्टोबर 2013 मध्ये गुजरातकडून विदर्भविरुद्ध केले. हा सामना त्याच्या कारकिर्दीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्याआधी त्याने 2012-13 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत महाराष्ट्राविरुद्ध टी20 सामन्याद्वारे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्या सामन्यात त्याच्या चमकदार कामगिरीने क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याने 2013 मध्ये केवळ 19 वर्षांच्या अल्पवयात मुंबई इंडियन्स संघात पदार्पण केले आणि तिथेही त्याने आपल्या आगळ्या शैलीने प्रभाव टाकला. या प्रदर्शनामुळे त्याला लवकरच भारतीय संघात स्थान मिळाले. जानेवारी 2016 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि आपल्या अचूक यॉर्कर आणि विविधतेमुळे विरोधकांना अडचणीत टाकलं. पुढे जानेवारी 2018 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूलँड्स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि तिथेही आपली कामगिरी सिद्ध केली. जसप्रीत बुमराह यांचा क्रिकेटमधील प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच त्याच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक संघर्षांचाही तोच प्रभाव आहे. वडिलांचे लहानपणीच निधन, आईचा आधार, आणि त्यांची मेहनत – या सर्व गोष्टींनी मिळून बुमराहला एक मजबूत आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवले आहे. त्यांच्या जीवनकथेवर नजर टाकली तर दिसून येते की संकटं कितीही मोठी असली तरी जिद्द आणि समर्पण असल्यास यश नक्कीच मिळू शकतं.