फोटो सौजन्य - Social Media
कोट्यवधींमध्ये पगार देणाऱ्या नोकऱ्या ऐकून अनेकांचा विश्वास बसत नाही, (Career) पण भारतात काही क्षेत्रांमध्ये अशी नोकरी मिळवणं शक्य आहे. अर्थात, यासाठी केवळ परिश्रम नाही तर उच्च दर्जाची कौशल्ये, दीर्घ अनुभव आणि नेतृत्वगुण आवश्यक असतात. बहुतेक वेळा या नोकऱ्या मोठ्या मल्टीनेशनल कंपन्यांमध्ये, वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप्समध्ये किंवा खासगी क्षेत्रात असतात, जिथे टॅलेंटला जास्त महत्त्व दिलं जातं. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगारामध्ये फक्त बेस सॅलरी नसते, तर बोनस, स्टॉक ऑप्शन (ESOPs) आणि कंपनीच्या कामगिरीनुसार मिळणारे इतर फायदेही असतात.
अशा पगाराच्या श्रेणीत येणाऱ्या सर्वात मोठ्या नोकऱ्यांमध्ये C-लेव्हल पदं (CEO, CFO, CTO, COO) अग्रस्थानी आहेत. या पदांवर कंपनीच्या सर्वात मोठ्या धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी असते आणि FMCG, फायनान्स, टेक्नॉलॉजी क्षेत्रातील टॉप कंपन्यांमध्ये त्यांना वर्षाला १ कोटी ते ५ कोटींपर्यंत पगार मिळतो. या पदांसाठी १५–२० वर्षांचा अनुभव आणि IIMसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून एमबीए आवश्यक मानलं जातं.
दुसरं क्षेत्र म्हणजे टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). येथे CTO, VP-इंजिनिअरिंग, AI/ML लीड्स आणि प्रॉडक्ट डायरेक्टर्स यांना प्रचंड मागणी आहे. गूगल, अमेझॉनसारख्या बिग टेक कंपन्या किंवा SaaS क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये अनुभवी इंजिनिअर्सना ₹१ कोटी ते ₹१.२ कोटींपर्यंत पगार मिळू शकतो. तिसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि प्रायव्हेट इक्विटी. मोठ्या व्यवहारांमध्ये सल्ला देणारे मॅनेजिंग डायरेक्टर्स किंवा पार्टनर्स वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात. त्यांचा पगार बेस सॅलरी, बोनस आणि कमिशनवर अवलंबून असतो.
आरोग्य क्षेत्रात सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणजे कार्डियोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन यांची कमाईही कोट्यवधींमध्ये असते. मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये किंवा स्वतःच्या क्लिनिकमधून हे डॉक्टर दरवर्षी ₹१ कोटी ते ₹२ कोटींपर्यंत कमावतात. थोडक्यात, या सर्व नोकऱ्या अशा लोकांसाठी आहेत जे आपल्या क्षेत्रात टॉपवर आहेत, नव्या कौशल्यांसह सतत प्रगती करत आहेत आणि मोठे निर्णय घेण्याची क्षमता ठेवतात.






