रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ बेरोजगारांना गंडा (Photo Credit - X)
लातूर, (शहर प्रतिनिधी): लातूर शहरात शरद जाधव-किनीकर आणि त्यांची पत्नी अंजली जाधव-किनीकर या ‘बंटी-बबली’ जोडीने नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरच्या या दाम्पत्याने मुंबई येथील रहिवासी सिद्धांत विजयकुमार बनसोडे आणि साक्षी वाघमारे यांना लक्ष्य केले. त्यांना रेल्वे खात्यात टीसी (TC) आणि आयकर विभागात (Income Tax) अधिकारी म्हणून नोकरी लावतो, असे खोटे आश्वासन देऊन २०२४ मध्ये विविध खात्यांवरून लाखो रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये फिर्यादीचे आजोबा चंद्रकांत बनसोडे यांनी लातूर येथील रामलिंग स्वामी यांच्या सांगण्यावरून फिर्यादींना शरद जाधव यांच्या घरी नेले. शरद जाधव यांनी आपली मंत्रालयात आणि दिल्लीत ओळख असल्याचे सांगितले. शरद जाधव आणि त्यांच्या पत्नीने सिद्धांत बनसोडे यांना रेल्वे विभागात टीसी (TC) ची नोकरी तर साक्षी वाघमारे यांना आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. सिद्धांत बनसोडे यांच्या नोकरीसाठी १२ लाख रुपये, तर साक्षी वाघमारे यांच्या नोकरीसाठी २२ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार, शरद जाधव-किनीकर यांना सुरुवातीला दोन लाख रुपये रोख देण्यात आले आणि ‘ऑर्डर’ आल्यावर उर्वरित दहा लाख रुपये देण्याचे ठरले. २८ लाख रुपये गमावल्याची तक्रार सिद्धांत बनसोडे यांनी पोलिसांत दिली आहे.
Akola Crime: पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!
आरोपींनी फसवणूक करण्याचा आणखी एक धक्कादायक मार्ग अवलंबला. त्यांनी बनसोडे यांना १५ दिवसांत ऑर्डर मिळेल असे आश्वासन दिले. काही दिवसांनी फिर्यादींना पोस्टाने रेल्वे विभागात टीसीचे बनावट नियुक्तीपत्र प्राप्त झाले. या नियुक्तीपत्रावर १७ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सीएसटी मुंबई येथे हजर होण्याचे आदेश होते. यानंतर आरोपींनी पीडित तरुणांना तीन महिन्यांचे ट्रेनिंगसुद्धा दिले.
सुरुवातीला कागदपत्र स्कॅनिंगचे काम देण्यात आले. १७ फेब्रुवारी २०२४ ते १६ एप्रिल २०२४ पर्यंत हे काम चालले. दरम्यान, काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने बनसोडे यांनी शरद किनीकर यांना वारंवार विचारणा केली. त्यावेळी शरद किनीकर यांनी उडवाउडवीची उत्तरे देणे चालू केले. ऑगस्ट २०२४ मध्ये फिर्यादीचे आजोबा जेव्हा पुन्हा शरद किनीकर यांना भेटले आणि नोकरी नको, आमचे पैसे परत करा, अशी मागणी केली, तेव्हा “मी तुमच्यावर कारवाई करेन” अशी धमकी देत आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
या दाम्पत्याने ३ ते ४० मुलांचे काम रखडल्याचे सांगितल्याने, ३४ हून अधिक बेरोजगार तरुण या जाळ्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सिद्धांत विजयकुमार बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद जाधव-किनीकर आणि अंजली जाधव-किनीकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह इतर कलमांन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय सुधाकर चव्हाण अधिक तपास करत आहेत.






