संग्रहित फोटो
पुणे : चार टक्के व्याजाने पाच लाख घेऊन त्याचे व्याज २ लाख १० हजार देऊनही त्रास देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पैसे नसतील तर बायकोला दुसर्या धंद्यात घाल अशा पद्धतीने अश्लिल बोलत मनास लज्जा होईल असे वर्तन केले आहे.
याप्रकरणात सावकारी करणार्यावर सावकारी आणि अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर) आणि विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ४७ वर्षीय अनुसुचित जातीच्या महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीने त्यांच्या दुकानाच्या नुतनीकरणासाठी राहुल काळभोर याच्याकडून २०२० मध्ये पाच लाख रूपये ४ टक्के व्याजाने घेतले होते. त्यांनी राहुल याचे २ लाख १० हजार व्याज स्वरूपात परत केले होते. तरी आरोपी तक्रारदाराच्या कुटुंबियांना त्रास देत होते. एकदा आरोपींनी तक्रारदारांच्या मुलाची बुलेट अडवून त्याची चावी काढून घेत पैशाची मागणी केली. त्यानंतर त्यांची कार तक्रारदाराच्या दुकानाला आडवी लावून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
तसेच आम्हाला शहाणपण शिकवता काय असे म्हणून अपमानीत केले. यावेळी तक्रारदाराचे पती त्यांना समजावुन सांगत असताना राहुल याने तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला दुसर्या धंद्यात घाल असे अश्लिल भाषेत बोलून स्त्री मनास लज्जा होईल असे कृत्य केले. या सर्व प्रकारानंतर तक्रारदार महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला
पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.