संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवडा भागातील बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या मुलांमध्ये स्वच्छतागृह साफ करण्यावरून वाद झाल्यानंतर पाच मुलांनी एका मुलाला बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
टॉवेल फाडून त्याची काठ फाडून त्या दोऱ्याने गळा आवळला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिंता कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे पाच मुलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत निरीक्षण गृहातील काळजीवाहक संतोष किसन कुंभार (वय ४९) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व मुले वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना बाल न्यायालयात हजर केल्यानंतर बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानूसार, ही मुले सुधारगृहात आहेत. दरम्यान, पाच मुलांना व यातील १७ वर्षीय जखमी मुलाला एकाच बॅरेकमध्ये ठेवलेले आहे. दोन दिवसांपुर्वी रात्री बराकमधील स्वच्छतागृह (बाथरुम) साफ करण्यास सांगितले होते. पण, त्याने ते स्वच्छ करण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला.
नंतर पाच मुलांनी त्याला धमकावून हाताने मारहाण केली. तसेच, शिवीगाळ करत टॉवेल फाडुन काढलेल्या काठाच्या दोरीने गळा आवळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने इतर मुलांनी तसेच तक्रारदार याठिकाणी आल्याने पुढील अनर्थ टळला. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : परवानगी नसतानाही अवजड वाहनांची पुण्यात ‘एंट्री’; तब्बल इतक्या जणांनी गमवला जीव