डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला (संग्रहित फोटो)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यात डंपरच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास किवळे येथील सई द्वारका हौसिंग सोसायटीसमोर ही भीषण घटना घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव दीपाल बहादूर साई (वय ३२, रा. विकासनगर, देहूरोड) असे असून, ते खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.
सकाळी कामावर जात असताना डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी डंपर चालक मोबाईलवर बोलत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी डंपर चालक प्रदीप मयूर यादव (रा. उत्तर प्रदेश) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. जड वाहनांवर बंदी असूनही वाहतूक सुरू असल्याचे या घटनेमुळे समोर आले.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत रविवारी सकाळी हा अपघात झाला. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज सकाळी ८ ते १२ व संध्याकाळी ४ ते १० या वेळेत जड वाहनांना बंदी आहे. तरीदेखील या वेळेत डंपर महामार्गावर धावत होता. यापूर्वीही हिंजवडी परिसरात अशाच अपघातात एका लहान मुलीचा बळी गेल्यानंतर संबंधित चालकावर आणि मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची कारवाई
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बन्सोडे यांनी सांगितले की, ‘हा अपघात रविवारी सकाळी झाला असून, आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे’.
बीड येथे भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नमालगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
हेदेखील वाचा : Beed crime: भीषण अपघात! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू; बीडमधील घटना