धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या (संग्रहित फोटो)
बार्शी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच बार्शीत मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल विकून आलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला.
रावण सोपान खुरंगुळे (वय ७०, रा. वाणेवाडी) असे खून झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगुळे असे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस पाटील राहुल लोखंडे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रावण सोपान खुरंगुळे यांनी बाजारात बैल विकले होते. त्याचे आलेले पैसे मुलगा अनंतराव याने मागितले. पण, पैसे न दिल्याने अनंतराव वडील रावण खुरंगुळे यांना रात्री काठीने व पोतराजाच्या वाकीने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत तालुका पोलिस ठाण्यात मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे करत आहेत. या अशा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काठीने बेदम मारहाण
काठीने व पोतराजाच्या वाकीने बेदम मारहाण करून खून केला. तालुक्यातील वानेवाडी येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उघडकीस ही घटना आली. घटनास्थळाची सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी पाहणी केली.
चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण
दुसऱ्या एका घटनेत, चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करणार्या पतीचा पत्नीने डोक्यात व शरीरावर ठिकठिकाणी मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल एक वर्षानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाकडून अंतिम अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अभिषेक अजेंट (वय २३, रा. साहिल हाईटस, चिंधेनगर, जांभुळवाडी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी वृषाली अजेंटराव (वय 24, रा. साहील हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) हिला अटक केली आहे.