संग्रहित फोटो
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील प्लॉट नंबर ११ झोपडपट्टीत जुन्या वादातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका १७ वर्षीय मुलावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. त्याच्या डोक्यात सपासप वार केल्यानंतर त्याचा हात मनगटापासून कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. काही काळ येथे तणाव देखील निर्माण झाला होता. अल्पवयीन मुलांचे टोळके पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेत १७ वर्षे ७ महिने वयाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर, १७ वर्षाच्या एका मुलासह त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना उजव्या बाजूला प्लॉट नंबर ११ ही झोपडपट्टी आहे. दोन्ही अल्पवयीन मुले येथील आहेत. जखमी मुलगा व यातील एका मुलाचे जुने वाद आहेत. या वादविवादामुळे जखमी मुलाला हडपसर भागात राहण्यास पाठविले होते. तो तेथेच काम देखील करतो. त्याचे आई-वडिल प्लॉट नंबर ११ मध्ये राहतात. दरम्यान, तो त्यांना भेटण्यासाठी बुधवारी दुपारी आला होता.
आई-वडिलांकडे आल्यानंतर तो झोपडपट्टीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात गेला. तेव्हा या टोळक्याने त्याला गाठले. तेथून त्याला बाहेर काढले. त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. डोक्यात पाठिवर वार होऊ लागल्यानंतर त्याने हात मध्ये घातला. तेव्हा आरोपींनी त्याच्या मनगटावर जोराचा वार केला. त्यामध्ये मुलाचा हातच मनगटापासून तुटून गेला. नंतर टोळके तेथून पसार झाले. तरुण रक्ताच्या थारोळ्यात तेथे किंचाळत पडला. नंतर येथील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांनी लागलीच धाव घेतली. तोपर्यंत अल्पवयीन मुलांचे टोळके पसार झाले होते. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास
पुण्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत
वानवडी परिसरात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजविल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर टोळक्याने घराच्या दरवाज्यावर कोयते मारून तसेच खिडकीची काच देखील फोडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तुकाराम कांबळे (वय ५२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे.