संग्रहित फोटो
पुणे : फडके हौद चौक परिसरात श्री साईबाबा पालखी सोहळ्यात गर्दीतून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९१ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. रविवारी (२९ जून) सकाळी साडेअकराच्या पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९१ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. सोनसाखळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरी
पीएमपी प्रवासात अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दोन लाख १२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली असून, शहरात सातत्याने या घटना घडत असल्याचेही समोर आले आहे. परंतु, पोलिसांना या घटनांना आवर घालण्यात यश आलेले नाही. याबाबत ३९ वर्षीय महिलेने विमनातळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार लोहगाव भागात राहतात. त्या कात्रज ते लोहगाव या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दोन लाख १२ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक घागरे तपास करत आहेत.