पैठण खुले कारागृहात कैद्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन (File Photo : Suicide)
पैठण : पैठण-अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनासह बंदिवानांमध्ये खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
शांतीलाल तान्हा ओझरे (वय ४४, रा. पालघर) असे असून तो बंदी क्रमांक सी-५५१३ आहे. सन २०२३ मध्ये नाशिक कारागृहातून त्याची पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात बदली करण्यात आली होती. तो येथे नित्यनेमाने शेतीकाम करत आपली शिक्षा भोगत होता. गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे इतर बंदींना दिसून आले. त्यांनी तात्काळ ही बाब खुले कारागृहाचे अधीक्षक राजेंद्र निमगडे यांना कळवली. यानंतर प्रशासनाने त्वरित पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे यांना माहिती दिली.
दरम्यान, याची माहिती मिळताच नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक संभाजी खाडे व उपनिरीक्षक अजीज शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. शांतीलाल ओझरे याने आत्महत्या का केली, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आले नाही.
यापूर्वीही कैद्याने केली होती आत्महत्या
विशेष म्हणजे ही घटना काही पहिली नाही. यापूर्वी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी देखील पैठण जिल्हा खुले कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुभाष रमेश केंगार (४५, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे) या कैद्याने जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती. गेल्या दोन वर्षांत जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोन कैद्यांनी आत्महत्या केल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्था, कैद्यांची मानसिक स्थिती तसेच प्रशासनाकडील देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोर्ट परिसरातच तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी साकेत कोर्टात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. हरीश सिंग असे या तरुणाचे नाव आहे, जो साकेत कोर्टात काम करणारा एक लिपिक होता. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. वृत्तानुसार, कामाच्या ताणामुळे त्या तरुणाने आत्महत्या केली. हरीश सिंगने कोर्ट कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तथापि, त्याने त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. हरीश ६० टक्के अपंग होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेदेखील वाचा : Suicide News: कोर्ट परिसरात धक्कादायक घटना! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा






