संग्रहित फोटो
कोल्हापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार, धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशातच आता कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोेल्हापूर शहरातील उपनगरातील हनुमाननगर, पाचगाव रोड परिसरात रिक्षाचालक मोहन पोवार याचा गळा चिरलेला आणि अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रिक्षाचालक पोवार याच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी तपासात सहभागी झाले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु असून, प्राथमिक चौकशीतून काही ठोस धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचगाव रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालक यांच्यात खळबळ उडाली आहे.
नागरिकांनी शांत राखावे, पोलिस सखोल तपास करत आहेत. लवकरात लवकर तपशील समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. रिक्षाचालक मोहन पोवार याच्या घरातून धूर बाहेर येत असल्याने शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
टोळक्याकडून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश उणेचा, चैतन्य, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात राहुल बंडू पवार (वय ३१, सध्या रा. काळेपडळ. मूळ रा. रांजणी, ता. गेवराई, जि. बीड ), गौरव नितीन साठे, राजा मुन्ना पंडीत जखमी झाले आहेत. पवार यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.