संग्रहित फोटो
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करणार्या पतीचा पत्नीने डोक्यात व शरिरावर ठिकठिकाणी मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल एक वर्षानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाकडून अंतिम अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अभिषेक अजेंट (वय २३, रा. साहिल हाईटस, चिंधेनगर, जांभुळवाडी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे पोलिसांनी आरोपी पत्नी वृषाली अजेंटराव (वय 24, रा. साहील हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) हिला अटक केली आहे. ही घटना १० जुलै २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास साहील हाईट्स चिंधेनगर आंबेगावखुर्द येथे घडली होती. याप्रकरणी उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिषेक हा एका खासगी कंपनीत काम करत होता. खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. कारागृहातून तो बाहेर आला होता. त्यानंतर तो वृषाली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत होता. वृषाली एका ठिकाणी नोकरी करत होती.
दरम्यान, अभिषेक पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करत होता. यामुळे ती वैतागलेल्या होती. त्यातूनच वृषाली हिने त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने हल्ला केला. तसेच त्याच्यावर शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब भारती विद्यापीठ पोलिसांना (तत्कालीन पोलिस ठाणे) समजल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. परंतु, डॉक्टरांना मृत्युचे नेमके निदान करता आले नाही. त्यांनी व्हिसेरा राखून ठेवला.
पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली होती. घटना घडली तेव्हा आपण घरी नव्हते. अभिषेक हा पडुन जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे वृषाली हिचे म्हणणे होते. दरम्यान, आंबेगाव पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर हे प्रकरण आंबेगाव पोलिसांकडे तपासासाठी आले. नुकताच याबाबतचा व्हिसेराचा अहवाल आला. या अहवालावर डॉक्टरांनी आपले निदान सांगून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वृषाली अजेंटराव हिच्याकडे पुन्हा चौकशी केली. नंतर गुन्हा नोंदवला. न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : प्रवासी तरुणीवरील अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी…