संग्रहित फोटो
पुणे : बाणेर भागात एका भरधाव डंपरच्या पाठिमागील चाकाखाली सापडून एका आयटी अभियंत्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, तिची सहप्रवासी मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर डंपरचालकाने पळ काढला. पोलिसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली आहे. तेजल प्रकाश तायडे (२७, रा. तलासरी, ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (१९ जून) मध्यरात्री घडला आहे. याच दिवशी तेजलचा वाढदिवस होता. तर, प्राची जगन्नाथ पाचंगे (२८, रा. डांगे चौक, थेरगाव) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तेजल आयटी अभियंता होती. ठाण्यातील एका कंपनीत काम करत होती. १६ जूनपासून कामानिमित्ताने पुण्यात आली होती. गुरुवारी तिचा वाढदिवस होता. त्यामुळे मैत्रीणीसोबत ती बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात जेवण्यास गेली होती. जेवणानंतर दोघी घराकडे निघाल्या. त्यावेळी गणेश मंदिर चौकात भरधाव वेगात डंपर जात होता. त्यावेळी हा अपघात झाला. यात तेजल गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राची पाचंगे हिच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला असून, पोलिसांनी डंपरचालक राहुल भीमराव राठोड (२४, रा. भोंडवे वस्ती, रावेत) याला रात्री अटक केली आहे.
गेल्या महिन्याभरात १४ जणांचा मृत्यू
मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत एका विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील जड वाहतूकीचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेंट मिक्सर आणि ट्रक यांसारख्या अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक चालक नियम धुडकावत आहेत. त्यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात शहरात विविध ठिकाणी १४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.