भिवंडी हादरली! खाडीकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह (Photo Credit- X)
भोजवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी भिवंडी खाडी क्षेत्रात एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. खाडी परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटल्याने स्थानिक रहिवाशांना संशय आला, त्यांनी पाहणी केली असता दलदलीच्या भागात एक मृतदेह अडकल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच भोजवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू केला.
ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला, तो भाग अत्यंत दलदलीचा होता. त्यामुळे पोलिसांना मृतदेहापर्यंत पोहोचणे आणि तो बाहेर काढणे कठीण जात होते. अखेर पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मच्छिमारांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर अत्यंत खबरदारीने हा मृतदेह दलदलीतून बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह खाडीच्या पात्रात वाहून आला की कोणी या ठिकाणी आणून टाकला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो तातडीने शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या स्थितीत असल्याने प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की ही हत्या, हे केवळ शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
भोजवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सांगितले की, “सध्या या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. ही व्यक्ती या दलदलीच्या भागात कशी पोहोचली आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.” मृताची ओळख पटवण्यासाठी पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची तपासणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून संशयास्पद बाबींवर लक्ष केंद्रित करत आहेत.






