संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिल्यानंतर बिल न देताच निघून जाणाऱ्या तरूणाच्या घरी हॉटेल कामगारांनी फोन करून बिलाची माहिती दिली. नंतर मात्र तरुणाने घरी का सांगितले याचा राग मनात धरत त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन सुरक्षा रक्षकावर धारदार हत्याराने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील भोसले (रा. सातववाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल शैलेश यादव (२७, रा. १५ नंबर, टेकडे पेट्रोल पंपवाजवळ, सम्राट हॉटेल, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुळचे उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून सध्या ते हडपसर येथील १५ नंबर परिसरात राहतात. तेथेच असलेल्या सम्राट हॉटेलमध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतात.
७ एप्रिल रोजी दुपारी निखील हॉटेलमध्ये आला होता. त्याने ऑर्डर केलेल्या दारूचे बिल न देताच तो निघून चालला असल्याने हॉटेलमधील कामगारांनी त्याला पकडले. यावेळी त्यांच्यात वादही झाले. त्याला नाव पत्ता विचारल्यानंतर निखील भोसले असे त्याने नाव सांगितले. त्यावेळी त्याच्या आई-वडीलांबरोबर बोलणे झाल्यावर तो निघुन गेला. नंतर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास तो लोखंडी हत्यार घेऊन आला. त्याने तक्रारदारांना काही समजायच्या आतच त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या उजव्या खांद्याला जखम झाली. त्यानंतर यादव यांना ससून रूग्णालयात नेण्यात आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
कराडमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण
कराड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारुंजी (ता. कराड) येथे जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी दुपारी वारुंजी येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलीस कर्तव्य बजावित असताना सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करून शिवीगाळ, धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचा गुन्हा पाच जणांवर दाखल केला आहे. अंकुश श्रीपती पाटील, प्रमोद अंकुश पाटील, धनाजी श्रीपती पाटील, शिला अंकुश पाटील, मंदाकिनी धनाजी पाटील (सर्व रा. वारुंजी, ता. कराड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.