संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज ते नवले ब्रिजदरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून, ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तीन आरोपींनी त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केली. हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी भोर आणि वेल्हा परिसरातही पोलिसांची पथके पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
पुण्यातील घटनेनं खळबळ
पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत असलेल्या व्यक्तीला मुलांना भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर सासरच्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना कोथरुड परिसरातील असून, याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नारायण पांडुरंग जानकर (वय ४८, रा. किष्कींदानगर, कोथरुड) यांनी गुरुवार पेठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार मयुरी नारायण जानकर, सुरेश लक्ष्मण बावदाने, महेश लक्ष्मण बावदाने, संगीता महेश बावदाने, भगवान बाबू मरगळे आणि लक्ष्मण राया बावदाने (रा. सुतारदरा, कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






