मृत युवकाचे नाव आयान शेख (वय 18) असे असून तो घणसोली परिसरात राहत होता. या घटनेत त्याचा भाऊ आदिल शेख तसेच रिक्षा चालक राजेंद्र वाशीवाले हे जखमी झाले आहेत.या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुब्या उर्फ सुभाष जाधव आणि सत्या उर्फ सतीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी स्वप्नील सुर्वे आणि प्रमोद मानकर यांना उशिरा रात्री अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घणसोली रेल्वे स्थानकाबाहेरील जम्बो किंग बर्गर या चौकात मोठ्या प्रमाणावर शेअर रिक्षा चालक प्रवाशांसाठी थांबत असतात. प्रवासी उचलणे, भाडे मिळवणे आणि रिक्षा क्रमांकावरून येथे अनेकदा चालकांमध्ये वाद होत असतात. परिसरात दादागिरी आणि मारामारीच्या घटनाही यापूर्वी घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.रविवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास प्रवासी घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. परिसरातील दगड, काठ्या यांचाही वापर करण्यात आला. त्यामुळे स्टेशन परिसरात मोठी गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला.
Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आदिल शेख यांनी त्यांचा धाकटा भाऊ आयान शेख याला घटनास्थळी बोलावले. आयानने दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.गंभीर जखमी झालेला आयान रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आयानला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न, सार्वजनिक शांततेचा भंग आणि हाणामारीचे गुन्हे दाखल केले होते. मात्र आयानचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवण्यात आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षा चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्वप्नील सुर्वे आणि प्रमोद मानकर यांना अटक केली.न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी यांनी दिली.
या घटनेनंतर घणसोली स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांची दादागिरी आणि प्रवासी भाड्यावरून होणारे वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्थानिक नागरिकांनी स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची तसेच रिक्षा स्थानकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.






