मजुरांच्या पिकअपला ट्रॅव्हलची धडक (संग्रहित फोटो)
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून महिला मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. यात १२ पैकी ६ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच मौदा आणि भंडारा येथे उपचारासाठी दाखल केले. ही घटना मौदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव पूल येथे गुरुवारी (दि. २७) सकाळी नऊच्या सुमारास घडली.
वंदना वाघाये (वय ५०), लीला चारमोरे (वय ३५), उत्तरा चामट, (वय ३५), वैशाली गेडाम (वय ३०), उषा पुडके (वय ३२), रिता भोवते (वय ३३) अशी जखमींची नावे आहेत. मालवाहू चालक मालक रमेश गोटेफोडे हे केशलवाडा ता. भंडारा येथील राहणारे आहेत. भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला मजूर मौदा तालुक्यात मिरची तोडणीसाठी ये-जा करतात. त्यात पिकअप वाहन मौदा तालुक्यातील धानला शिवारात महिला मजूर घेऊन जात होते. तसेच एक ट्रॅव्हल्स पिकअप वाहनाच्या मागे होती. दोन्ही वाहने भंडारा येथून नागपूरच्या दिशेने येत होती.
हेदेखील वाचा : टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…
दरम्यान, सकाळी नऊच्या सुमारास बोरगाव येथे पिकअप धानलामार्गे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. त्यामुळे पिकअप गाडी महामार्गाच्या बाजूला जाऊन लोखंडी कठड्याला धडकली.
अपघातानंतर चालक पसार
या अपघातात महिला मजूर एकमेकींच्या अंगावर तर काही महिला खाली पडल्या. त्यांना जबर दुखापत झाल्याने अनेकांनी आरडाओरडा केली. घटनास्थळी बोरगाव येथील नागरिक धावून आले. यादरम्यान ट्रॅव्हल्सचालक त्या ठिकाणावरून पळून गेल्याने काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला.
रायगडमध्येही झाला होता भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पहाटे घनदाट धुक्यामुळे भीषण अपघात नुकताच झाला. पुण्याहून खेडच्या दिशेने प्रवास करणारी खासगी ट्रॅव्हलर बस भोगाव गावाजवळील पुलाजवळ बॅरिकेडला धडक देत थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 10 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहेत.
हेदेखील वाचा : Ratnagiri News : धुक्यामुळे भीषण अपघात; ट्रॅव्हलर बस दरीत कोसळून 22 जण जखमी






