संग्रहित फोटो
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील एका नामांकित बिल्डरला ४६ लाखांहून अधिक रक्कम जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावून त्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनिल दिलीप अरगडे (वय ३७, रा. महावीर नगर, माणिकबाग) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपी धीरज दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब अरगडे (वय ३९, रा. मुळा रोड, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०२४ ते दोन मे २०२५ या कालावधीत फोनवर व प्रत्यक्ष भेटीत घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार आणि उमेश बारणे या दोघांना बाळासाहेब अरगडे याने धमकावत, तक्रारदाराच्या मालकीच्या फर्मच्या बँक खात्यातून एकूण ४६ लाख ९३ हजार ७०० रुपये ट्रान्सफर करायला लावले. तसेच, आरोपीने तक्रारदाराला शिवीगाळ करून आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. ‘पैसे न दिल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारेल,’ अशी धमकीही आरोपीने दिली. आरोपीने तक्रारदाराचे जंगली महाराज रस्त्यावरील ‘डी. एस. अरगडे प्रमोटर्स अॅण्ड बिल्डर्स’ हे कार्यालयही बंद पाडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.