संग्रहित फोटो
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईने व तिच्या प्रियकराने मिळून खून केला. या प्रकरणात आरोपी आईसह तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी गुरुवारी (दि. ११) हा निर्णय दिला.
शोभा दमडू चव्हाण (वय ५०) आणि नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (वय ४५, दोघेही रा. मोझर) अशी आरोपींची नावे आहेत. शोभा आणि नरेंद्र या दोघांचे अनैतिक संबंध होते. यामध्ये शोभाचा मुलगा कमल चव्हाण (वय ३०) हा अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी ऑगस्ट २०२० मध्ये त्याचा धारदार शस्त्राने मारून शोभाच्या घरातच खून केला. नंतर त्याचा मृतदेह स्मशानभूमीत फेकून दिला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शोभाने अनोळखी चौघांविरोधात मुलाचा खून केल्याची तक्रार दिली. मात्र, तत्कालीन ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी केलेल्या तपासात शोभा आणि तिचा प्रियकर नरेंद्र हे दोघे आरोपी असल्याचे पुढे आले. या दोघांना मृतदेह फेकताना एकाने पाहिले होते. त्यावरून आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर नेर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
खोटा पुरावा दिल्याप्रकरणी नोटीस
या प्रकरणात दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच आरोपी नरेंद्र ढेंगाळे याला ५० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास २ वर्ष सश्रम कारावास तर शोभा चव्हाण हिला १० हजार दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा देण्यात आली. दंडाची रक्कम मृतकाची पत्नी व तिच्या तीन मुलींना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली. तर फितूर झालेला साक्षीदार पंकज याला खोटा पुरावा का दिला म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश पारित केला.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर; मात्र भक्कम युक्तिवाद
न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पकंज कावरे हा फितुर झाला. मात्र, सरकारी वकील अॅड. मंगेश गंगलवार यांनी भक्कम युक्तिवाद केला. दोषारोप पत्रातील मुद्दे आणि परिस्थितीजन्य पुरावे याची सांगड घालत गुन्हा कोणी केला याची उकल केली. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांना सदर शिक्षा ठोठावली.