संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार, यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांना यश मिळत नाही. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंदननगर भागात चुलतीला आय लव यू म्हणाल्याचा रागातून तरुणाचा दोघांनी हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. चंदननगर येथील भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चंदननगर येथील डॉ. आंबेडकर वसाहतीत वाल्हेकर, शर्मा आणि जानराव राहतात. जानराव याने यातील एका आरोपीच्या चुलतीची छेड काढत तिला बोलण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन त्यांच्यात वादही झाला होता. मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी वाल्हेकर, शर्मा यांनी जानराव याच्याशी पुन्हा वाद घातला. छेड का काढली? असा जाब विचारला. नंतर त्याला लाथाबुक्क्यांनी, तसेच हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जानराव गंभीर जखमी झाला.
आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी जानराव याला रहिवाशांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनेनंतर पसार झालेले वाल्हेकर आणि शर्मा यांना पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक विकास बाबर करत आहेत.
हे सुद्धा वाचा : नवऱ्याशी भांडण, पत्नीची कॅनॉलमध्ये उडी; धाडसी पोलिस मार्शलने वाचवले प्राण