कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
कुरुंदवाड : सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या अब्दुललाट शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ सचिन मेथे व त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी १५ ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दाम्पत्याने पोलिस ठाण्यासमोर डिझेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस व तक्रारदार यांच्यात झटापटही झाली.
संगीता मेथे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २१ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवीवर बँकेच्या तळंदगे शाखेत बोगस कर्ज काढून ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप केला आहे. ७ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी अशोक पाटील यांच्यासह एकूण २४ जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, गुन्हा नोंदवला न गेल्याने ७ जून रोजी त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
हेदेखील वाचा : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका
मेथे यांचा आरोप आहे की, वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही कारवाई झाली नाही. उलट ११ ऑगस्ट रोजी त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढल्याचे पत्र देण्यात आले. बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगनमताने स्वतःवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी कुटुंबासह आत्मदहनाचा निर्णय घेतल्याचे सांगत, याप्रकरणी निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, मुख्यमंत्री, गृहमंत्री आदींकडे पाठवण्यात आल्या होत्या.
हेदेखील वाचा : MHADA Lottery : मुंबईत फक्त घरेच नाही तर आता स्वस्त दुकाने खरेदी करू शकता, जाणून घ्या म्हाडाचा ई-लिलाव कधी आणि कसा होईल?