मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली...;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
Devndra Fadnavis News: ” मुंबई महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली. आता तिथे विकासाची हंडी लावली जाणार असून त्यातील लोणी सर्वसामान्य जनतेला वाटण्यात येईल, यावेळी मुंबई महानगर पालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुंबई महापालिका निडणुकांचे रणशिंगही फुंकले आहे. वरळीत गोविंदा पथकाने सादर केलेल्या ‘छावा मनोऱ्या’चे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत येथे हंडी फोडली. त्यानंतर घाटकोपर (पश्चिम) येथील आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेतील लोणी आतापर्यंत कुणी खाल्ले हे तुम्हाला माहिती आहे. ते तुम्ही माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण जनतेला माहिती आहे, हे लोणी कुणी खाल्लं असं म्हण त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोलाही लगावला. तसेच. महाराष्ट्रात आज पारंपरिक उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. संपूर्ण मुंभईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, पण तरीही गोविंदांच्या उत्सवाचा पाऊस त्याहून मोठा आहे.’ असं कौतुक करत त्यांनी गोविंदा पथकांचा उत्साह द्विगुणित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने बोलताना म्हटले, “दहीहंडी आणि गणेशोत्सवावर पूर्वी बंधनं होती. मात्र, शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ती सर्व बंधनं हटवण्यात आली. आता आमचं सरकार असून दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होत आहे.” दुसरीकडे मनसे व शिवसेनेच्यावतीनेही मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात राजन विचारेंकडून निष्ठेची दहीहंडी फोडली जाणार आहे.
राजधानी मुंबईसह उपनगरातील दहीहंडी उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिक उंचच उंच मानवी मनोरे पाहण्यासाठी, तसेच सेलिब्रिटींचा जल्लोष अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईत गर्दी करतात. सोशल मीडियावरदेखील मुंबईच्या दहीहंडीची चर्चा रंगते.
Vice President Elections: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; ‘या’ नावांवर होणार चर्चा
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवात राजकीय रंग अधिक गडद दिसून येत आहे. शिवसेना, मनसे आणि भाजपच्यावतीने हा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभरात मुंबईतील तब्बल 10 ते 15 दहीहंडी उत्सवांना भेट देणार असून, दुपारी 1 वाजता वरळीतील ‘परिवर्तन दहीहंडी उत्सवा’पासून त्यांच्या भेटीची सुरुवात झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थर लावत विक्रम नोंदवला आहे. घाटकोपर येथील मनसेच्या दहीहंडी उत्सवात या पथकाने दहा थरांचा मानवी मनोरा रचून उपस्थितांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी ठाण्यातील वर्तक नगर येथील प्रो. गोविंदा स्पर्धेतून जय जवान पथकाला बाद ठरवण्यात आले होते. मात्र, आज दहीहंडी दिनी या पथकाने भव्य मनोरा रचत आपली ताकद आणि कौशल्य प्रभावीपणे दाखवून दिले.