सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कौटुंबिक तसेच वैवाहिक वादातून विवाहितेने सोमवारी (११ ऑगस्ट) रात्री कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, पर्वती दर्शन पोलिस चौकीच्या बीट मार्शलवरील पोलिसांनी या महिलेचे धाडसाने प्राण वाचविले. पोलिसांच्या धाडसाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. बीट मार्शल किरण पवार आणि राहुल उनाळे असे या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही घटना घटना रात्री साडेअकराच्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे घडली आहे.
पवार आणि उनाळे हे पर्वती बीटवर पेट्रोलिंग करत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक भागात कॅनॉलजवळ एक महिला उभी असल्याचे दिसले. ती संशयास्पदरीत्या उभी होती. तिची हालचाल पाहून त्यांनी तिला हटकले. महिला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तेव्हा पोलिस कर्मचारी तिच्याकडे जात असतानाच तिने कॅनॉलमध्ये उडी घेतली. महिलेचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पाण्यात उडी घेतली. पाण्याच्या वेगात महिला सुमारे शंभर मीटर वाहत गेली. दुसरीकडे उनाळे यांनी कॅनॉलच्या काठाने धावत जाऊन पवार यांना मदत केली.
पवार यांनी पाण्यात वाहत जाणाऱ्या महिलेपर्यंत पोहोचून तिला पकडले आणि किनाऱ्याजवळ आणले. किनाऱ्यावर उनाळे यांनी त्यांना हात देत पाण्याबाहेर काढले. महिलेची अवस्था पाहता तिला त्वरित सुरक्षित ठिकाणी आणून प्राथमिक काळजी घेतली. नंतर दोन्ही पोलिस मार्शलनी तिला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले. प्राथमिक चौकशीत पतीसोबतच्या वादविवादातून तिने मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रण पुराव्यासाठी जतन केले आहे. पोलिसांच्या या तत्पर व धाडसी कृतीचे स्थानिकांनी कौतुक केले असून, संकटसमयी पोलिस हे केवळ कायदा राखणारेच नव्हे तर जीव वाचवणारेही असतात, याचा प्रत्यय या घटनेतून आला.
विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
पुण्यात एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला अन् त्यांच्या पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह होऊन वर्ष पुर्ण होत असतानाच सासरच्यांकडून कंपनीसाठी २० लाख रुपये आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे तिने सतत होणाऱ्या छळाला कंटाळून शेवटी गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघे अशांवर भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.