सोलापूर-पुणे हायवेवर अपघात (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघत
5 जण जागीच ठार तर एक जखमी
वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली
मोहोळ: पुणे-सोलापूर या महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाटी येथे शनिवार दि 17 जानेवारी रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर थडकल्याने भीषण अपघात होऊन 5 जण जागीच ठार झाले तर एक महिला जखमी झाली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेली कार (MH-46 Z 4536) या वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून हा अपघात झाला.
या वाहनामध्ये एकूण सहा प्रवासी (तीन पुरुष व तीन महिला) होते. सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याचे समजून येत आहे. अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये अर्चना तुकाराम भंडारे (वय 47 वर्ष), माला रवी साळवे (वय 40 वर्ष), विशाल नरेंद्र भोसले (वय 41 वर्ष), अमर पाटील (वय 37 वर्ष), आनंद माळी (वय 40 वर्ष), सर्वजण रा. पनवेल खारघर जि रायगड हे पाच जण जागीच ठार झाले असून ज्योती जयदास टाकले, रा. सेक्टर 7, पनवेल, जि. रायगड ही महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेस तात्काळ उपचारासाठी प्रथम मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात तर नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मदत पुरवून आवश्यक ती उपाय योजना करण्यात आली. हा अपघात अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः वाहनामध्ये अडकले होते. त्यांना कार मधून बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने कारचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले. कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकली होती. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत.
108 व बुंगा फाईट ॲम्बुलन्सचे मदतकार्य
अपघात घटनास्थळी बुंगा फाईट ॲम्बुलन्स ने तत्काळ पोहोचत त्याठिकाणची परिस्थिती पाहून कारमध्ये अडकलेल्या मृताना बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावून कारचे दरवाजे तोडून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तर एक महिला ही गाडी झाडाला धडकताच तिच्या बाजूकडील दरवाजा हा उघडल्यामुळे ती उडून बाहेर पडली होती त्यामुळे तिला जखमी अवस्थेत 108 ॲम्बुलन्स मध्ये तत्काळ प्रथम मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात तर नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुंगा फाईट च्या ॲम्बुलन्स मध्ये इतर पाच जणांचे मृतदेह मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत.






