संग्रहित फोटो
पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात ही घटना घडली आहे. कारमधून जात असताना अपहरण करण्यात आले आहे. दरम्यान, पसार झालेल्या अपहरणकर्त्यांचा शोध पुणे ग्रामीण पोलिसांची पथके घेत आहेत. याप्रकरणी ऊरळी देवाची पोलिस ठाण्यात पाच जणांवररुद्ध खंडणी, अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५८ वर्षीय डॉक्टरांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ऊरळी कांचन परिसरात दवाखाना आहे. ते कुंजीरवाडी परिसरात राहायला आहेत. १० जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास डॉक्टर, त्यांचा चालक आणि मदतनीस महिला कारने निघाले होते. ऊरळी कांचनमधील प्रयागधाम रस्त्यावर कारमधून आलेल्या पाच जणांनी डॉक्टरांची कार अडविली. त्यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. आरोपींनी डॉक्टरांना मारहाण केली. एका आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाचा चावा घेतला. कारचालक, डॉक्टर, तसेच मदतनीस महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तिघांना डांबून ठेवले.
त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर डॉक्टरांकडून १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. खंडणी उकळण्यात आल्यानंतर डॉक्टरांसह तिघांची सुटका करुन आरोपी पसार झाले. डॉक्टरांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे तपास करत आहेत.






