आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना दगडाने ठेचले; बुलडाण्याच्या चिखलीतील घटना (संग्रहित फोटो)
बुलडाणा : दारूच्या नशेत आईला मारहाण करत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने दारूड्या बापाची दगडाने ठेचून हत्या केली. चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथे शुक्रवारी (दि. 21) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घटना घडली. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले आहे.
सुरेश रमेश भांडवले (वय 43) असे मृत बापाचे नाव आहे. धोत्रा नंदई येथील सुरेश भांडवले हा व्यसनी होता. दारू पिऊन पत्नीस मारहाण करायचा. शुक्रवारी (दि. 21) दुपारी दारू पिऊन आल्यानंतर पत्नी छायाला मारहाण करू लागला. आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने मुलास राग अनावर झाला. त्याने डोक्यात दगड घालून वडिलांना ठार केले. अमडापूर पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.
मुलगा सैलानी यात्रेनिमित्त पिंपळगाव सैलानी येथे कामाला गेला होता. दोन दिवसांपासून वडील आईला मारहाण करत असल्याची माहिती मिळताच तो घरी परतला. त्याने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पुन्हा पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून मुलाचे माथे फिरले आणि त्याने बापास दगडाने ठेचून संपविले. शवविच्छेदनानंतर रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यातही हत्येचे प्रकरण
दुसऱ्या एका घटनेत, ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. तुळजाभवानीनगर, खराड) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवदास तुकाराम गिते (वय 37) असे नराधम पतीचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. शिवदास गिते याने कात्रीने वार करत पत्नीचा गळा चिरला. यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपी शिवदासने पत्नीवर कात्रीने वार केला, तेव्हा त्याचा लहान मुलगा खुर्चीवर समोरच बसला होता. हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा व्हिडिओ देखील काढला होता.