एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
कोल्हापूर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातही अत्याचाराची घटना समोर आली आहे. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्वजीत जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीचा ओळखीचा असून, २०१८ पासूनच त्याने तरुणीसोबत गैरकृत्य सुरू केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. दोनवेळा इच्छेविरुद्ध गर्भपातही करायला लावला होता, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्ता गाडेने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्ये सुद्धा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राज्यात आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर सतत 6 महिने अत्याचार केला. या अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बलात्कारासाठी दिली 100 रुपयांची सुपारी
दुसऱ्या एका घटनेत, विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आला होता. त्यानंतर आता मोर्शी येथे अत्याचार प्रकरण समोर आले आहे.
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.