लाच घेताना अभियंत्याला अटक (फोटो- istockphoto)
इचलकरंजी: अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी 90 हजार रुपयांची मागणी करुन 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी (वय 49 रा. उपकार रेसिडेन्सी सांगली रोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त काही मंडळींनी कारवाई झाल्याचे समजल्यानंतर चक्क महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. तर कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असलेल्या तक्रारदाराने शहरातील एका अपार्टमेंटमधील 18 फ्लॅटमध्ये वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात दिली होती. हा अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदार हा कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटला असता राठी यांनी 18 प्लॅटचे प्रत्येकी 5 हजार रुपयेप्रमाणे 90 हजार रुपये दिल्यास प्रकरण मंजूर होईल असे सांगत लाचेची मागणी केली होती.
या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केली असता राठी यांनी 90 हजाराच्या मागणीस दुजोरा देत तडजोडीअंती 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत मंगळवारी दुपारच्या सुमारास राठी यांना 30 हजाराची लाच स्विकारताना ताब्यात घेतले. राठी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने केली.
फसवणूक प्रकरणातील आणखी दोघांना अटक
शेअर ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे भरपूर नफा मिळवण्याचे अमिष दाखवून डॉ. दशावतार गोपालकृष्ण बडे (वय 56, रा. जवाहरनगर) यांची 93 लाख 35 हजार रुपये फसवणुक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखीन दोघांना अटक केली आहे. रितेश अरुण वंजारी (वय 36 रा. नागपूर) व बंधन बँकेचा सेल्स मॅनेजर अनिष रशिद शाह (वय 32 रा. हिंगणा रोड नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी डिसेंबर 2024 मध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर मोहन महादेव साहु (वय 38, रा. देवळी रोड, धुळे) याला यापूर्वी अटक केली असून आरोपींची संख्या तीन झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजीतील डॉ. दशावतार बडे यांना अॅक्सीस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी कंपनीच्या गुंतवणुकीविषयी आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले. डॉक्टरांचा विश्वास संपादन करुन त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. 13 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत डॉ. बडे यांनी 93 लाख 35 हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये भरले. मात्र या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.